प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रात मोठे निवासी प्रकल्प, मोठी हॉटेल्स व बाजारपेठा येथे तयार होणाऱया ओल्या कचऱयाचे प्रमाण जास्त असते. असे निवासी प्रकल्प व हॉटेलांना आता स्वत:हून ओल्या कचऱयावर प्रक्रिया करावी लागणार आहे, अशी माहिती पालिका संचालक तारिक थॉमस यांनी दिली आहे.
थॉमस यांनी शनिवारी मडगाव पालिकेला भेट देऊन कचऱयाच्या विषयावर चर्चा केली व सर्व बाबींचा आढावा घेतला. कचरा उचल व विल्हेवाटीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्षा पूजा नाईक, मुख्याधिकारी अजित पंचवाडकर, पालिकेचे अन्य अधिकारी, अभियंते तसेच रूपेश महात्मे, डॉरीस टेक्सेरा, दामोदर नाईक, सुगंधा बांदेकर, क्लारा फर्नांडिस, जाफर बुधानी, अविनाश शिरोडकर आदी नगरसेवक उपस्थित होते. सत्ताधारी गटाचे बहुतेक नगरसेवक उपस्थित नव्हते.
निवासी प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात ओला व सुका कचरा गोळा होत असतो. सुक्या कचऱयाची उचल पालिका करणार, मात्र ओल्या कचऱयावर निवासी प्रकल्पातच प्रक्रिया करणे आता क्रमप्राप्त बनणार आहे. 40 हून अधिक निवासी गाळे असलेले प्रकल्प मोठे प्रकल्प म्हणून पाहिले जाणार आहेत, असे थॉमस यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्या निर्देशात अशा प्रकल्प?ांनी स्वतःहून कचऱयाची विल्हेवाट लावावी असे स्पष्ट केलेले आहे हे त्यांनी नजरेस आणून दिले.
अन्यथा कायद्याचा बडगा उगारावा लागेल
मोठय़ा हॉटेलांनाही कचऱयाची विल्हेवाट अशा प्रकारे स्वत:हून लावावी लागेल. अन्यथा आवश्यकता भासल्यास कायद्याचा बडगा उगारावा लागेल, असे पालिका संचालकांनी स्पष्ट केले. पालिकेचे अधिकारी तसेच नगरसेवकांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. आवश्यक सहकार्य सरकारकडून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
दोन प्रकल्पांत यशस्वीरीत्या प्रक्रिया
यावेळी ओल्या कचऱयाची विल्हेवाट निवासी प्रकल्पातच कशी लावली जाऊ शकते याबाबत डॉ. स्नेहा भागवत या बिगरसरकारी संस्थेच्या सदस्यांनी माहिती दिली. मडगावात शंभरहून अधिक निवासी गाळे असलेल्या दोन प्रकल्पांत यशस्वीरीत्या कचऱयावर प्रक्रिया केली गेल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. गौरव पोकळे यांनी प्रक्रियेसाठी उपलब्ध सुविधांची माहिती देऊन उपस्थित?ांना मार्गदर्शन केले. मडगावात करण्यात आलेल्या पाहणीत 60 हून अधिक मोठे निवासी प्रकल्प असल्याचे आढळून आले होते. तेथे व मोठय़ा हॉटेलांना ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्यास सांगण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.