सेन्सेक्स 112 अंकांनी घसरला – जागतिक वातावरण सकारात्मक
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारच्या कामगिरीत भारतीय भांडवली बाजारातील वातावरण नकारात्मक राहिले आहे. यामध्ये दिवसभरातील सत्रात एचडीएफसी बँक, एचडीएफसी, कोटक बँक आणि बजाज फायनान्स यासारख्या कंपन्यांचे समभाग प्रभावीत झाल्याने सेन्सेक्समध्ये घसरण अनुभवायला मिळाली.
जागतिक पातळीवरील वातावरणातही सकारात्मक कल राहिल्याने चढउताराचे वातावरण राहिले होते. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 112.16 अंकांसह 0.19 टक्क्यांच्या नुकसानीसोबत 60,433.45 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 24.30 अंकांच्या नुकसानीसोबत 18,044.25 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक म्हणजे दोन टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच एचडीएफसी, बजाज फायनान्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी, कोटक बँक आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभागही घसरुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र नफा कमाईत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
सकाळच्या दरम्यान सेन्सेक्स सकारात्मक सुरु झाला होता परंतु नंतर बाजारात घसरण राहिली असून खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागात दबाव राहिला होता. याचा परिणामही भारतीय बाजारावर झाल्याची माहिती आहे.
अन्य आशियाई बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे लाभात राहिले असून जपानचा निक्की मात्र घसरणीसह बंद झाला आहे. टेडिंगदरम्यान युरोपीय बाजार लाभात होता, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.91 टक्क्यांनी वाढून 84.19 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.