आंतरराष्ट्रीय सीमेवर 3 महिन्यांच्या कालावधीत दुसऱयांदा मिळाले भुयार
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट पाकिस्तान रचत आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर भुयाराच्या मार्गाने दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचे काम सुरू आहे. मागील 3 महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर दुसऱयांदा भुयार आढळून आले आहे. दोन्ही भुयारांच्या निर्मितीची पद्धत एकसारखीच होती.
3 महिन्यांमध्ये दुसरे भुयार आढळल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमेसह अन्य भागांमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सीमेवर अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झाल्यास त्वरित प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा भागात हे भुयार आढळून आले आहे. पाकिस्तानच्या दिशेकडून हे भुयार तयार करण्यात आले होते, जे आता बंद करण्यात आले आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये सांबा सेक्टरमध्येच भुयार दिसून आले होते. यंत्रांनी तयार करण्यात आलेल्या या भुयारांचा वापर दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी केला जातो. सीमेवर भारतीय सैन्य दक्ष असल्याने कुंपण ओलांडून घुसखोरी करणे दहशतवाद्यांना जड जात आहे. पाकिस्तान भुयारांचा वापर करुन सुरक्षा दलांच्या नजरेआडून दहशतवाद्यांना घुसवू पाहत आहे.
भुयार सापडल्यावर पूर्ण क्षेत्रातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अधिकाऱयांनी सीमेवर जाऊन स्थितीचा आढावा घेतला आहे. सद्यकाळात केंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय जम्मूमध्ये स्थानांतरित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये मोठा हल्ला घडविण्याचा पाकिस्तानचा कट असू शकतो.