सुमारे तासभर स्फोटक परिस्थिती
प्रतिनिधी /मडगाव
मडगावचा मोती डोंगर हा नेहमीच चर्चेचा व वादाचा विषय असतो. दर निवडणुकीत तो प्रामुख्याने चर्चेत असतो. मोती डोंगरावरील मतदार हे नेहमीच दिगंबर (बाबा) कामत यांच्या बाजूने राहतात. यंदा तो भाजपचे उमेदवार बाबू आजगांवकर यांच्यामुळे चर्चेत होता. कारण, बाबू आजगांवकर हे मोती डोंगरावर खिंडार पाडतील व बाबांना शह देतील असे गृहित धरले जात होते. काल दिगंबर कामत यांनी मोती डोंगरला भेट दिली ते पाहून बाबूचा पारा चढला व त्यांनी तुफान शाब्दीक मारा केला. त्यामुळे सुमारे तासभर मोती डोंगरावर स्फोटक परिस्थिती निर्माण झाली.
काल सकाळी भाजपचे उमेदवार बाबू आजगांवकर हे आपल्या समर्थकांसह मोती डोंगरावरील मतदान केंद्रावर गेले होते. त्यावेळी पोलिसांनी रोखले व केवळ दोघांनाच प्रवेश दिला जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे बाबू आजगांवकर हे मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आले. यावेळी त्यांनी येथील मतदारांकडे देखील संवाद साधला. बाबू मोती डोंगरावरून कारमधून खाली येत असताना दै. तरूण भारतच्या प्रतिनिधीने त्यांची कार थांबवून प्रतिक्रीया जाणून घेतली.
आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना त्यांनी मोती डोंगरावरील बेकायदेशीर घरांना घर क्रमांक देतो असे सांगून दिगंबर (बाबा) कामतने त्यांची गेली सुमारे 15 वर्षे फसवणूक केल्याचा आरोप केला. येथील मतदारांना निवडणुकीच्या वेळी खोटी आश्वासने द्यायची, पैसे व बिर्याणी देऊन त्यांची मते घेतली जातात असा आरोप बाबू आजगांवकर यांनी केला. तेव्हढय़ात दिगंबर कामत हे आपल्या कारमधून मोती डोंगरावर पोचले. त्यांना मोती डोंगरावर पाहताच बाबू भडकले.
हा आणखीन कशाला आला इथे म्हणून कारमधून खाली उतरले व दिगंबर कामत पाठोपाठ मोती डोंगरावर गेले. दिगंबर कामत यांच्या सोबत मोती डोंगरावरील त्यांचे समर्थक मोठय़ा संख्येने जमा झाले व तेही मतदान केंद्राकडे जाऊ लागले. त्याला बाबू आजगांवकर यांनी आक्षेप घेतला. आपल्याला मतदान केंद्राकडे जाण्यास मर्यादा घालण्यात आली तर दिगंबर कामतना का मोकळीक दिली जाते असा सवाल उपस्थित करून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करू लागले. संतप्त झालेल्या बाबूनी या ठिकाणी डय़ुटी बजावणाऱया पोलिसांना जाब विचारण्यास सुरवात केली.
आम्हाला काही सांगू नका आमच्या साहेबांना सांगा
दिगंबरच्या आगमनामुळे भडकलेल्या बाबूनी पोलिसांना कारवाई करा असे सांगण्यास सुरवात केली. यावेळी डय़ुटीवरील पोलिसांनी आम्हाला काही सांगू नका आमच्या साहेबांना सांगा असे प्रतिउत्तर दिले. त्यामुळे बाबू आणखीन भडकले. त्यांनी पोलीस निरीक्षक सहकार्य करीत नसल्याने, त्यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यास सुरवात केली. तो पर्यंत दिगंबर कामत आपल्या समर्थकांना भेटून त्यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला व ते मोती डोंगरावरील टाकीजवळ पोचले. बाबू व त्यांचे बंधू तसेच अवघेच समर्थक त्यांच्या पाठोपाठ टाकीजवळ गेले.
तुम्ही ‘आजोबा’चे नाव धुळीस मिळविले
मोती डोंगरावरील पाण्याच्या टाकीजवळ स्व. अनंत नायक यांचे नातू प्रभव नायक हे त्या ठिकाणी उभे होते. बाबूनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवून त्यांच्यावर तोंड सुख घेतले. स्व. बाबू नायक हे आपले आदर्श, त्यांच्यामुळे आपण राजकारणात आलो. बाबू नायक हे महान होते. मात्र, तुम्ही दिगंबर कामत यांना पाठिंबा देऊन त्यांचे नाव धुळीस मिळविल्याचा शाब्दीक हल्ला चढविला. बाबूच्या या अचानक शाब्दीक हल्ल्यामुळे प्रभव गोंधळून गेले. त्यानंतर बाबूनी आपला मोर्चा पुन्हा दिगंबर यांच्याकडे वळविला. दिगंबर कामत काही केल्या दाद देत नसल्याचे पाहून त्यांना अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी पोलिसांकडे करू लागले. यावेळी कामत यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता ते म्हणाले की, बाबू वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडात शिवराळ भाषा येऊ लागली आहे. आपण त्यांना काडीची सुद्धा किंमत देत नाही. आपल्याला त्यांचे पडून गेलेले नाही. यावेळी कामत यांच्या समर्थकांनी बाबू आजगांवकर यांची जबरदस्त हुर्यो उडविली. बाबू आजगांवकर हे मोती डोंगरावर येऊन दादागिरी करतात असा आरोप कामत यांच्या समर्थकांनी केला. त्याच गोंधळात कामत हे मोती डोंगरावरून खाली आले व मोती डोंगरावरील दुसऱया बाजूच्या झोपडपट्टीकडे वळले. बाबू आजगांवकर देखील त्या ठिकाणी गेले.
गुन्हेगारांना घेऊन फिरतात
या ठिकाणी पुन्हा एकदा बाबू आजगांवकर यांनी दिगंबर कामत यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढविला. ते गुन्हेगारांना घेऊन फिरतात, तलवार व अन्य प्रकरणातील आरोपी त्यांच्या सोबत असून पोलिसांनी त्यांना अटक केली तर कामत त्यांची सुटका करतात असा आरोप केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक व इतर पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. बाबूनी त्यांना सुद्धा खडे बोल सुनावले.
या संपूर्ण स्फोटक परिस्थितीत दिगंबर कामत यांनी पूर्ण संयम बाळगला. तसेच आपल्या समर्थकांवर देखील नियंत्रण ठेवले. तर दुसऱया बाजूने बाबू आजगांवकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन दिगंबर कामत यांच्यावर आरोप करणे चालू ठेवले. दिगंबर कामत हे मोती डोंगरावरून गेल्यानंतरच बाबू शांत झाले.
भाजप वाले कधीच विचारपूस करीत नाही
यावेळी मोती डोंगरावरील तरूणांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करताना दिगंबर कामत हेच आमचे नेते असून ते अडचणीच्यावेळी तसेच अन्य समस्यांच्या वेळी आमच्या सोबत असतात. कोविड महामारीच्या काळात त्यानीच मदत केली. भाजपवाले आमची दखल सुद्धा घेत नाही. केवळ निवडणुकीच्यावेळीच मोती डोंगरावर येत असल्याचे सांगितले.