प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या मोती डोंगरावर कोरोना पॉझिटिव्हचे 17 रूग्ण आढळून आल्यानंतर सरकारने अखेर मोती डोंगरावरील सुलभ शौचालय ते बीएसएनएल क्वार्टर्स आणि रेणुकादेवी मंदिर ते पाण्याची टाकी हा परिसर कंन्टेमेंन्ट झोन म्हणून घोषित केला आहे. तर उर्वरित परिसर बफर झोन ठेवण्यात आला आहे. मोती डोंगरावर जाण्यासाठी असलेल्या सर्व वाटा बंद करण्यात आल्या असून पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत.
आत्ता पर्यंत मोती डोंगरावरील 400 लोकांची चाचणी घेण्यात आली असून त्यात 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. अद्याप ही या ठिकाणी चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यावरच मोती डोंगरावरील एकूण चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारने कंन्टेमेंन्ट झोन जाहीर केल्यामुळे मडगाव भाजपने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मोती डोंगरावरील अनेक युवक हे गांधी मार्केट तसेच न्यू मार्केटमधील व्यापाऱयाच्या दुकानावर नोकरी करीत असतात. तसेच गांधी मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आकें भागातील अनेक घरांनी मोती डोंगरावरील महिला मोलकरीण म्हणून काम करतात. त्याच्या पासून कोरोना संसर्गाचा फैलाव होण्याची भीती असल्याने कंन्टेमेंन्ट झोन होणे आवश्यक होते व सरकारने योग्य निर्णय घेतल्याचे भाजपचे शर्मद पै रायतूरकर यांनी म्हटले आहे.
मोती डोंगरावरील एकाच कुटूंबातील जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या असून त्यांच्या संपर्कात आलेले देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्याच्या संपर्कात जेव्हढय़ाचा संपर्क आला होता. त्यांचा शोध घेऊन त्या सर्वांची चाचणी घेण्याचे काम सद्या सुरू आहे. ज्यांनी अद्याप चाचणी घेतलेली नाही. त्या सर्वांनी स्वताची चाचणी करून घ्यावी असे आवाहन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केले आहे. मोती डोंगरावर पसरलेला संसर्ग हा मांगोरहिलशी कनेक्ट आहे.
मोती डोंगरावरील रहिवाशांना अत्यंत महत्वाचे व गरजेचे काम असल्यास बाहेर पडण्याची मान्यता दिली जात असून नेहमीच्या पद्धतीने कुणालाच बाहेर पडू दिले जात नाही. येथील स्थिती नियंत्रणात येई पर्यंत मोती डोंगर कंन्टेमेंन्ट झोनमध्ये राहणार आहे.