सात-बारा उताऱयावर बेकायदेशीर नावे : कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मोदगा येथील सर्व्हे क्रमांक 43 ही जमीन मारुती देवस्थान मोदगा सार्वजनिक ट्रस्टची आहे. मात्र ‘त्या’ जमिनीवरील नावामध्ये फेरफार करुन ‘ती’ जमीन काही जणांच्या नावावर करण्यात आली आहे. त्यानंतर एका संस्थेला विकण्यात आली. बोगस कागदपत्रे तयार करुन या जमिनीची विक्री करण्यात आली आहे. तेव्हा संबंधितांवर कारवाई करावी आणि या जमिनीवर पूर्वी प्रमाणेच या ट्रस्टचे नाव दाखल करावे, या मागणीसाठी मोदगा ग्राम पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
मोदगा येथील सर्व्हे क्रमांक 43 ही जमीन 92 एकर 39 गुंठे आहे. ती जमीन एकाच्या नावावर करुन बेकायदेशीररित्या एनए केली आहे. काही जणांनी दमदाटी करुन या जमिनीवर नावे दाखल करण्यात आली आहेत. तेव्हा या सर्व प्रकरणाची चौकशी करुन ‘त्या’ जमिनीवर पूर्वीचे नाव दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्राम पंचायतीकडे एनओसीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र ग्राम पंचायतीने तो नाकारला आहे. असे असताना अचानकपणे त्यावर दुसऱयाची नावे दाखल झाली आहेत. त्यानंतर त्या जमिनीची विक्री करण्यात आली आहे.
या प्रकरणात अनेक जण सामील आहेत. तेव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर पीडीओ यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.