दिल्ली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवार मध्यरात्री 2 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. अकाऊंट हॅक केल्यानंतर केंद्राने बिटकॉईनला मान्यता दिल्याचे ट्विट त्यावरुन करण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसने ह्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं समोर येताच काँग्रेसने या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवला आहे. पंतप्रधानांच्या अकाऊंटवरुन बिटकॉईन या चलनव्यवस्थेला समर्थन दर्शवणारं ट्वीटही करण्यात आलं होतं. यावरुन काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.
लोकसभेत चौधरी यांनी ह्या मुद्द्यावर चर्चा केली. ते म्हणाले, ज्या वेळी सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे, नेमकं त्याचवेळी पंतप्रधानांचं ट्विटर हँडल हॅक होतं आणि त्यावरुन सरकार क्रिप्टोकरन्सी स्विकारत असल्याच्या आशयाचं ट्वीट केलं जातं. त्यामुळे आता सरकारने हे संसदेत हे स्पष्ट करावं की क्रिप्टोकरन्सी स्विकारण्यात येणार आहे की नाही, नक्की हे प्रकरण काय आहे?
जर पंतप्रधानांचं ट्विटर खातं हॅक होत असेल तर सरकार इतर नागरिकांच्या ट्विटर अकाऊंट्सच्या सुरक्षिततेबद्दल कशी खात्री देऊ शकेल? हा गंभीर मुद्दा आहे. देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या आधीही त्यांचं अकाऊंट हॅक झालं होतं. एका वर्षात दोन वेळा पंतप्रधानांचं ट्विटर अकाऊंट कसं काय हॅक होऊ शकतं याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायलाच हवं, अशी मागणीही चौधरी यांनी केलं आहे.