पंतप्रधानांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये उमटत राहिली स्मित हास्याची लकेर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बेकफास्ट मीटिंग देखील कशी फुलवता येते, याचे उत्तम प्रत्यंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी टोकियोतील भारतीय ऑलिम्पियन्सना आपल्या निवासस्थानी बोलावून दिले. हॉकी संघात अनेक पंजाबी खेळाडू असल्याने केरळच्या पीआर श्रीजेशला त्यांनी पंजाबी शिकलास का, असा प्रश्न विचारत तर उंचापुऱया ड्रग फ्लिकर रुपिंदर पाल सिंगला कितना हाईट है, अशी गुगली टाकत त्यांनी या मीटिंगमध्ये सातत्याने स्मित हास्याची लकेर उमटवत ठेवली. निमित्त होते ऍथलिट, त्यांचे प्रशिक्षक व कुटुंबियांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित बेकफास्ट मीटिंगचे!
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर्स व 200 मीटर्स इव्हेंटमधील पहिल्याच फेरीत गारद झालेल्या दुती चंदने आपली ओळख सांगण्यासाठी काही मिनिटे घेतली आणि प्रत्युत्तरात मोदी म्हणाले, ‘जर राजकारण्यांनी हे भाषण ऐकले तर ते तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरवतील!
ओडिशाची असूनही इतकी उत्तम हिंदी कशी बोलता येते, असा प्रश्नही त्यांनी दुतीला केला. रौप्यजेती वेटलिफ्टर मिराबाई चानू हिला मोदींनी पाठदुखी कमी झाली का, असा प्रश्न विचारला. शिवाय, मणिपूरमधील ट्रक ड्रायव्हर्सचा चानूने केलेला सन्मान कौतुकास्पद असल्याचे ते आवर्जून म्हणाले.
चोप्राला प्रश्न, हा आत्मविश्वास कुठून येतो?
मोदींनी चोप्राला त्याच्या पसंतीचा चुर्मा घेण्यास सांगितले आणि त्याचवेळी त्यांनी चोप्राला फायनलमधील एका थ्रो वेळी भाला कुठवर गेला आहे, हे पाहण्याआधीच केलेली विजयाची खूण कशी लक्षवेधी होती, याचा उल्लेख केला. दुसऱया थ्रो नंतर तू विजय साजरा केलास. खरंच इतका आत्मविश्वास होता का, असे त्यांनी चोप्राला विचारले. विजय तुम्हारे सर पर नही चढता, पराजय तुम्हारे मन मे नही बैठता, वह बॅलन्सिंग चीजे देखी, असे मोदी नीरजला यावेळी म्हणाले.
यावेळी नीरजने कठोर परिश्रमामुळे हे शक्य झाल्याचे नम्रपणे नमूद केले. नंतर हॉकीपटूंशी संवाद साधताना मोदी म्हणाले, ‘टीव्हीवर क्रिकेट सामना प्रक्षेपित केला जातो, त्यावेळी यष्टीरक्षकालाच अधिक वेळ दाखवले जाते. पण, अगदी ऑलिम्पिक पदक जिंकले तरी लोकांना हॉकीत गोलरक्षक कोण आहे, याची पूर्ण कल्पना असत नाही’.
तिरंदाज दीपिका कुमारी, बॉक्सर मेरी कोम यांनी पदक जिंकू शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असता मोदी त्यांना म्हणाले, ‘क्या सॉरी? उम्मीद छोडेगा तो खिलाडी नही होता’! त्यांनी मेरीने आजवर दिलेल्या योगदानाचाही येथे उल्लेख केला. पीव्ही सिंधूचे दक्षिण कोरियन प्रशिक्षक पार्क ते-सँग यांना मोदींनी अयोध्येला एकदा भेट देण्यास सांगितले. या ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये हॉकीपटूंनी हॉकी स्टीकवर स्वाक्षरी करत ती मोदी यांना भेटीदाखल दिली तर नीरजने सुवर्ण जिंकलेला भाला मोदींकडे सुपूर्द केला.
जेव्हा बॉक्सर बोर्गोहेन मोदींना ग्लव्ज भेट देते…
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणारी लोवलिना बोर्गोहेन हिने पंतप्रधान मोदींना मुष्टियुद्धातील ग्लव्जची भेट दिली, त्यावेळी ते ग्लव्ज हाती घेत मोदी स्मित हास्याने तिला उद्देशून म्हणाले, ‘मै ये पहनूंगा तो पॉलिटिक्स के लोग बोलेंगे, मोदी गडबड करने वाला है’!