ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता मंत्रिमंडळासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता संसर्ग तसेच उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मागील गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याची सल्ला दिला होता. डेल्टापेक्षा तिप्पट जास्त संसर्ग असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आणि जिल्हा आणि तहसील पातळीवर सतर्कता ठेवण्याचे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
दरम्यान, भारतातील ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत चिंता व्यक्त केली जात आहे. हा धोका लक्षात घेऊन अनेक राज्य सरकारांनी रात्रीची जमावबंदी तसेच निर्बंध जाहीर केले आहेत. ओमिक्रॉनची सर्वाधिक 238 प्रकरणे राजधानी दिल्लीत आहेत तर महाराष्ट्र 167 प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात 78 प्रकरणांसह तिसऱया क्रमांकावर आहे. शिवाय इतर राज्यांमध्ये येऊन तेलंगणा (62), तामिळनाडू (45) येथे ही प्रकरणे आहेत. देशातील एकूण ओमिक्रॉन संक्रमित लोकांची संख्या आता 781 वर गेली आहे.