ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला भेट देणार आहेत. पण यांच्या केदारनाथ दौऱ्याला तेथील पुजाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी बुधवारी केदारनाथला पोहचलेत. तेथे त्यांनी पुजारी व पंडा समाजाच्या प्रतिनिधींशी बंद खोलीत बराच वेळ चर्चा केली.
याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. आदी शंकराचार्य यांच्या स्मृतीस्थळाचे अनावरण करण्यासाठी मोदी शुक्रवारी (ता.५) केदारनाथला जाणार आहेत. उत्तराखंड सरकारने देवस्थान मंडळ स्थापन केले आहे. तो निर्णय मागे घ्यावा, अशी पुजारी व पंडा समाजाची मागणी आहे. त्यासाठी धामी यांनी एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती. पण कोणताही निर्णय न झाल्याने पुजाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यालाही विरोध केला आहे.