वृत्तसंस्था/ लखनौ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तरप्रदेशच्या दौऱयात पिपरसंड येथील इन्स्टीटय़ूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सेसच्या कामाचा शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता अमित शाह यांनी स्वतःच्या संबोधनात योगी सरकारचे कौतुक केले आहे.
उत्तरप्रदेशात पूर्वी महिलांना असुरक्षित वाटत होते. माफिया अवैध पद्धतीने जमिनींवर कब्जा करायचे. 2017 मध्ये भाजपने उत्तरप्रदेशला विकसित करण्याचे आश्वासन दिले होते. योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या टीमने उत्तरप्रदेशातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्याचे काम केल्याचे शाह म्हणाले.
देशातील दुसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था
देशात सुरू असलेल्या विकासाच्या 44 योजनांमध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या टीमने पूर्ण देशात या 44 योजनांमध्ये अग्रस्थान मिळविले आहे. उत्तरप्रदेशाने सर्व क्षेत्रांमध्ये विकास केला आहे. राज्याची अर्थव्यवस्था मागील 4 वर्षांमध्ये 11 लाख कोटींवरून वाढत 22 लाख कोटींवर पोहोचली आहे. उत्तरप्रदेश आता देशातील दुसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारे राज्य ठरल्याचे कौतुकोद्गार गृहमंत्र्यांनी काढले आहे. या संबोधनातून शाह यांनी आगामी निवडणुकीत योगींचेच नेतृत्व पुढे केले जाणार असल्याचा संदेश दिला आहे.
कल्याण सिंगांबद्दल विचारपूस
या कार्यक्रमानंतर शाह यांनी रुग्णालयात दाखल उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले आहे.