सोलापूर प्रतिनिधी
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करीत असताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मोदी भागात मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ उमेश शेवाळकर (वय 29, रा. बेळम, ता. उमरगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकी नरसिंग पागे (रा जय जांबमुनीनगर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी शेवाळकर हे महावितरणच्या गुरूनानक चौक कार्यालयात कार्यरत आहेत. ते व त्यांचे सहकारी गोकुळ कांबळे हे न्यू जगजीवनराम झोपडपट्टी येथे थकित वीज बिल ग्राहकांची यादी घेऊन गेले होते. त्यांनी लक्ष्मी पागे यांच्या वीज बिल थकबाकीचा भरणा केला का याची चौकशी केली. त्यांनी बिल भरले नसल्याने ते वीजपुरवठा खंडित करण्याकरता गेले. त्यावेळी आरोपी विकी याने फिर्यादीस धक्काबुक्की, मारहाण व शिवीगाळ केली. अधिक तपास फौजदार माधव बेंबडे हे करीत आहेत.