ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखनऊमधील डीजीपी परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी शुक्रवारी संध्याकाळी लखनऊला पोहोचले. शहीद पथावर असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये कालपासून दि. 19 सुरू झालेली परिषद उद्या संपेल. या परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सर्व राज्यांतील पोलीस महासंचालक, डीजीपींसह बडे अधिकारी उपस्थित आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलीस मुख्यालयाचं निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी सिग्नेचर इमारतीच्या आसपास असलेल्या अपार्टमेंटमधील नागरिकांना 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बाल्कनीत कपडे वाळत न घालण्याच्या सूचना केल्या.
पोलीस मुख्यालयाच्या सिग्नेचर बिल्डिंगजवळच्या सरस्वती अपार्टमेंटला गोमतीनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये मोदींचा दौरा होईपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. अपार्टमेंटमधील नागरिकांना 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बाल्कनीत कपडे वाळत घालू नका, अपार्टमेंटमध्ये एखादी नवी व्यक्ती राहायला आल्यास त्याची सूचना द्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.