नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज, बुधवारी विस्तार होणार आहे. राजधानी दिल्लीत सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील फेरबदलांमुळे वेगवान हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही ठरला असून, नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन’ अर्थात ‘सहकार मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या मंत्रालयाची घोषणा केली होती. हे मंत्रालय देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्याचं काम करणार आहे.
केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून या मंत्रालयाबाबतची माहिती दिली आहे. या मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ मिळणार आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सहाकरी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी कामी येईल. याद्वारे सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमधील विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे.