ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मोदी सरकारने 2017 मध्ये इस्रायलचे ‘पेगासस’ हे स्पाय सॉफ्टवेअर खरेदी केले होते. पाच वर्षापूर्वी इस्रायलसोबत झालेल्या 15 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारात पेगासस स्पायवेअर खरेदीचा समावेश होता. या संरक्षण करारात भारताने काही शस्त्रास्त्रांसह क्षेपणास्त्र यंत्रणाही खरेदी केली होती. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या अमेरिकास्थित तपास यंत्रणेने इस्रायलच्या एनएसओ कंपनीकडूनही पेगासस खरेदी केल्याचे या वृत्तपत्राने वर्षभराच्या तपासानंतर उघड केले आहे. एफबीआयने देशांतर्गत पाळत ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आपल्या योजनेचा एक भाग म्हणून अनेक वर्षे त्याची चाचणी देखील केली. परंतु, गेल्या वर्षी एजन्सीने पेगासस वापरणे थांबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, एफबीआयचा निर्णय पेगासस राज उघडण्यापूर्वी आला की त्यानंतर आला, हे या अहवालात स्पष्ट झालेले नाही.
पेगासस स्पायवेअरचा वापर जगभरात गुप्त टेहळणीसाठी कसा करण्यात आला, हे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मेक्सिकोने त्याचा उपयोग पत्रकार आणि सरकारच्या विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी केला, तर सौदी अरेबियाने महिला हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार जमाल खशोगी यांची हेरगिरी करण्यासाठी त्याचा वापर केला. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने ज्या देशांमध्ये पेगाससच्या वापरास मंजुरी दिली, त्या देशांमध्ये पोलंड, हंगेरी आणि भारतासह इतर अनेक देशांचा समावेश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
पेगासस स्पायवेअर भारतात कसे आले?
जुलै 2017 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये आले तेव्हा मोदी आणि इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भारताने इस्रायलकडून आधुनिक शस्त्रास्त्रे आणि स्पाय सॉफ्टवेअर खरेदी करण्याचा करार केला. हा संपूर्ण करार सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा होता.