अहमदनगर /प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच आपली धडाकेबाज शैली आणि निर्भिड वक्तव्यं यामुळे चर्चेत असतात. शिवसेनेची नेहमी संकटकाळी धुरा सांभाळणारे राऊत आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्या अशाच एका धडाकेबाज वक्तव्यामुळे. राऊत यांनी एका कार्यक्रमात सत्ता, पॉवर म्हणजे काय असते हे त्यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरणासहीत स्पष्ट केलं. हे सांगताना त्यांनी हेही सांगितलं की, नरेंद्र मोदी सुद्धा आपण समोरुन जाताना थांबून चौकशी करतात.
अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे विधान केलं. सत्ता, पॉवर म्हणजे काय असते हे त्यांनी त्यांच्या एका भाषणात स्पष्ट केलं. ते म्हणाले “सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का? असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो.पण मी समोरुन जात असताना मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई? याला म्हणतात सत्ता, पॉवर. सुरुवातीच्या काळात आम्ही हाता मार्मिक ठेवायचो. मार्मिक दिसला की लोक समजायचे पॉवर आहे, शिवसैनिक आहे, मग बसायला जागा मिळायची. कारण त्यांना कळायचं की हा शिवसैनिक आहे. मग गुजराती लोकदेखील सामना पेपर सोबत ठेवायला लागले. ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, तेही संरक्षणासाठी सामना सोबत ठेवायला लागले. शिवसेना हे सगळ्यांचं प्रोटेक्शन आहे. याला म्हणतात पॉवर.