थायलंड ओपन बॉक्सिंग : मोनिकासह तीन भारतीय उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला बॉक्सर मोनिकाने थायलंड ओपन बॉक्सिंग स्पर्धेत 48 किलो वजन गटात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोनदा पदके मिळविणाऱया फिलिपाईन्सच्या जोसी गॅबुकोला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. भारताच्या अन्य दोन बॉक्सर्सनीही उपांत्य फेरी गाठली आहे.
आशिष कुमार (81 किलो) व मनीषा (57) यांनी शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे. दोघांनी थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविले. 26 वर्षीय मोनिकाने थायलंडच्या अनुभवी गॅबुकोवर 4-1 अशा गुणांनी विजय मिळविला. 2012 व 2008 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गॅबुकोने सुवर्ण व कांस्यपदक मिळविले होते. मोनिकाची उपांत्य लढत व्हिएतनामच्या त्रिन्ह थाय दिएम कीवशी होणार आहे. त्रिन्हला पुढे चाल मिळाल्याने ती उपांत्य फेरीत पोहोचली आहे.
टोकियो ऑलिम्पिकनंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱया आशिषने 81 किलो वजन गटाच्या लढतीत थायलंडच्या अपिशित के. याच्यावर 5-0 असा विजय मिळविला. त्याची उपांत्य लढत इंडोनेशियाच्या मैखेल रॉबर्ड मुस्किताशी होणार आहे. महिलांच्या 57 किलो गटात मनीषाने युवा आशियाई स्पर्धेत दोनदा चॅम्पियन ठरलेल्या थायलंडच्या पॉर्नटिप बुआपावर 3-2 अशी मात केली.
रेणू (54 किलो) व मोनिका (63 किलो) यांना मात्र उपांत्यपूर्व लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. रेणूने इटलीच्या युरोपियन यू-22 चॅम्पियन सिरिन छराबीविरुद्ध झुंजार लढत दिली. पण छराबीनेच अखेर 3-2 अशी बाजी मारली. मोनिकाला मात्र स्थानिक बॉक्सर पनपतचारा सोमनुएककडून पराभव स्वीकारावा लागला. पंचांनी ही लढत तिसऱया फेरीत थांबवून पनपतचाराला विजयी घोषित केले. मंगळवारी स्पर्धेच्या तिसऱया दिवशी सुमित, गौरव चौहान कझाकच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढत देतील. सुमितची (75 किलो) लढत तिमुर नुर्सीतोव्हविरुद्ध तर गौरवची (91 किलो) लढत 2018 चा युवा ऑलिम्पिक चॅम्पियन ऐबेक ओरलबेविरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱयाला 2000 अमेरिकन डॉलर्स, रौप्य व कांस्य विजेत्याला 1000 व 500 डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. 2019 मध्ये झालेल्या मागील स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 4 रौप्य व 3 कांस्यसह एकूण आठ पदके मिळविली होती.