२७ हजार ६८३ विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
प्रतिनिधी / कागल
राज्य शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत दिली जाणारी पुस्तके कागल तालुक्यात पोहोच झाली आहेत. एकूण मागणी पैकी 80 टक्के पुस्तके तालुक्याला प्राप्त झाली आहेत. कागल तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शाळांना पुस्तके पोहोच करण्यात आली आहेत. तालुक्यात एकूण २७६८३ विधार्थ्यांसाठी मोफत पाठयपुस्तके दिली जाणार आहेत.
पहिलीसाठी ३०६८, दुसरी साठी ३२८९, तिसरी साठी ३२८९, चौथीसाठी ३२२३, पाचवीसाठी ३५१४ , सहावी साठी ३६७४, सातवी साठी ३६४३, आठवीसाठी ३७८३ अशी वर्गनिहाय विद्यार्थांना पुस्तके मिळणार आहेत. शाळा सुरु करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्यात बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्या संभ्रमात आहेत. ठोस निर्णय होऊन तारीख निश्चित होइपर्यंत संभ्रमाची स्थिती राहणार आहे. मात्र, तरीही शासनाने पाठ्यपुस्तके वेळेत दाखल केली आहेत. तालुका स्तरावर विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोच करण्याचे काम सुरू आहे. याबाबत तालुका गटशिक्षण अधिकारी जी . बी . कमळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, केंद्रस्तरावर आम्ही पुस्तके पोहोच केली आहेत . १५ जून रोजी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील . असे नियोजन केले आहे .