ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. उद्या हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार आहे. त्यावर चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांनी विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्या कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लसीकरणाबद्दल 1 मे रोजी सरकारची काय भूमिका आहे यावर चर्चा केली जाणार आहे. यानंतर बैठकीत सर्वानुमते काय निर्णय घेण्यात आला याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील, असे अजित पवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे, मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाईल. राज्याच्या जनतेचा हिताचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, लसीची कमतरता केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशात आहे. याशिवाय, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. या सगळ्याचे अधिकारी केंद्र सरकारला आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावेत म्हणून आम्ही उत्पादकांशी चर्चा करत आहोत. परंतु, भारत सरकारने प्रत्येक राज्यासाठी रेमडेसिवीरचा कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्या महाराष्ट्राला अधिक साठा देता यावा म्हणून केंद्राशी चर्चा करत आहे.
तसेच आम्ही रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. आपल्याकडे आठ दहा कंपन्या आहेत. मात्र, त्या पुरेसा साठा देऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्लोबल टेंडर काढणार आहोत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून केंद्र सरकारची परवानगी घेऊनच पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.