दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसचे घोषणापत्र : तरुणाईला बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन
दिल्ली विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेसने स्वतःचे घोषणापत्र रविवारी प्रसिद्ध केले आहे. पक्षाने सत्तेवर आल्यास दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज देणे आणि किफायतशीर दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी दिल्लीत 100 इंदिरा कँटीन्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने लाडली योजना पुन्हा लागू करण्यासह विद्यार्थ्यांना बालवाडीपासून पीएचडीपर्यंतचे मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. पदवीधर तरुण-तरुणींना दर महिन्याला 5000 तर पदव्युत्तराला 7500 रुपये बेरोजगारी भत्त्यादाखल देणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने पाणी आणि वीज पुरवठय़ात ग्राहकांसाठी कॅशबॅक योजना सादर करणार असल्याचे नमूद केले आहे. तर अर्थसंकल्पाचा 25 टक्के हिस्सा प्रदूषण रोखणे आणि वाहतूक सुविधा सुधारण्यावर खर्च करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. लोकपाल लागू करणे आणि दिल्लीला झोपडपट्टीमुक्त करणार असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. घोषणापत्रात महिला सुरक्षा, शिक्षण, वीज आणि पाणी पुरवठा, रोजगार आणि दलित-आदिवासींच्या कल्याणासारखे 20 मुद्दे सामील आहेत.
महिलांसाठी घोषणा
काँग्रेसच्या घोषणापत्रात जेंडर रिसोर्स सेंटर आणि 181 हेल्पलाईन सुरू करण्याचे आश्वासन आहे. वर्षभरात महिलांना एकदा मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करणे तसेच महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘आवाज उठाओ’ कार्यक्रम सुरू करणार असल्याचे म्हटले गेले आहे.
शिक्षणातील सवलती
घोषणापत्रात मुलींसाठी पीएचडीपर्यंतचे मोफत शिक्षण तसेच झोपडपट्टींमध्ये राहणाऱया सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणावर अनुदान देण्याचा मुद्दा सामील आहे. ‘या आणि खेळा’ योजनेंतर्गत 1 रुपयांच्या शुल्कावर शाळेचे मैदान मुलांना उपलब्ध करण्याची घोषणा यात सामील आहे. सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व्याजमुक्त कर्ज देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.