बेळगाव/प्रतिनिधी
बेळगाव रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटरवर प्रवाशाचा मोबाईल लांबविलेल्या युवकास रेल्वे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. व्यंकटेश शिवराज दोडमनी (वय 24, रा. मरगाईनगर, बेळगाव) असे या युवकाचे नाव आहे. सदर युवकाने जून महिन्यात रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटरवर तिकीट घेण्यास आलेल्या रेल्वे प्रवाशाचा मोबाईल लांबविला होता.
सदर मोबाईलची किंमत 10 हजार रुपये असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरून या मोबाईल चोरटय़ाला तब्बल सात महिन्यांनंतर पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. रेल्वे पोलीस स्थानकाचे रमेश टी. यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.