34 मोबाईलसह एक लॅपटॉप जप्त : कर्नाटकातील पाच जणांवर गुन्हा, तिघांना अटक : स्थानिक गुन्हे अन्वेषण, सायबर सेलची कारवाई
प्रतिनिधी /कोल्हापूर
जिल्हय़ातील गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल चोरणाऱया कर्नाटकातील आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 34 मोबाईल व एक लॅपटॉप असा 3 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सायबर सेल यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता जिल्हय़ातील 11 पोलीस ठाण्यातील 34 मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टोळीतील अनिल शिवाप्पा बंडीवडर (रा. हुलगीणकोप्पा, ता. हाणगल, जि. हावेरी) सतीश बसवराज भोई (रा. कुडची, ता. रायबाग), शशी बसवंत वडर (वय 27), प्रदीप लक्ष्मण भद्रावती उर्फ वडर, राजेश गोपाल मेहरवाडे (वय 27, सर्व रा. हाणगल जि. हावेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यापैकी अनिल, शशी आणि राजेश यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे उपस्थित होते.
जिल्हय़ात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करण्याची सूचना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना केली होती. त्यानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे व त्यांच्या पथकाकडून तपास सुरू होता. यादरम्यान गोपनीय सूत्राकडून रेकॉर्डवरील मोबाईल चोरटा अनिल बंडीवडर हा लक्ष्मीपुरी येथे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याजवळ दोन चोरीचे मोबाईल मिळाले. अधिक चौकशी केली असता प्रदीप वडर आणि सतीश भोई यांच्या साथीने जिल्हय़ात दोन वर्षांपासून मोबाईल चोरत असल्याची कबुली त्याने दिली. यानंतर मोबाईल चोरटय़ांच्या या साखळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
असे चालत होते साखळीचे काम
अनिल, प्रदीप आणि सतीश हे जिल्हय़ातील गर्दीच्या ठिकाणी, आठवडी बाजारात मोबाईल चोरत असत. हे मोबाईल ते त्यांच्या गावी हाणगल येथे घेऊन जात असत. शशी वडर चोरीचे मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन हाणगल येथील गांधी सर्कलमधील राजेश मेहरवाडे यांच्या सोनी मोबाईल दुकानातून लॅपटॉपद्वारे मोबाईलचे लॉक काढणे, डाटा डिलिट करणे, आयएमईआय नंबर बदलत होता. त्यानंतर शशी मोबाईलची विक्री करत होता. मोबाईल चोरीचे आहेत हे माहित असूनही राजेश यामधील काही मोबाईल स्वतःच्या दुकानातून विक्री करत होता.
प्रदीप आणि सतीशला सांगलीत अटक
प्रदीप वडर आणि सतीश भोई हे दोघे सध्या सांगली जिल्हय़ातील मोबाईल चोरीच्या गुन्हय़ात अटकेत आहेत. त्यांच्यावर 15 मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर या सर्व गुन्हय़ांमधील फरार अनिलला अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. प्रदीप आणि सतीशला चौकशीसाठी लवकरच कोल्हापुरात आणले जाणार आहे. शशी वडरला सदर बझार येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निपाणी पोलिसांकडून 90 हजारांचे मोबाईल जप्त
गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मोबाईल चोरीप्रकरणाच्या चौकशीनंतर बुधवारी निपाणी शहर पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 90 हजार रुपये किंमतीचे 18 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. सैफअली नगारजी (वय 20) व समीर शेख (वय 20, दोघेही रा. निपाणी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी न्यायालयाने या दोघांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. वरील दोघा चोरटय़ांनी आठवडी बाजारात तसेच रात्रीच्या वेळी झोपलेल्या व्यक्तींचे मोबाईल चोरले होते. सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी शहर पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर, हवालदार उदय कांबळे, पोपट ऐनापूरकर, विनोद असोदे, शेखर असोदे, बसवराज नावी, सूदर्शन आस्की, एस. एस. चिकोडे यांनी हा तपास केला. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे.