मुद्देमालासह संशयिताला अटक, पणजी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
सांत इनेझ येथील मोबाईल दुकानात झालेल्या चोरी प्रकरणाचा पणजी पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास लावला आहे. संशयिताला मुद्देमालासह अटक केली आहे. सोमवारी पूर्ण रात्रभर तपासकामात मग्न असलेल्या पणजी पोलिसांनी अखेर संशयिताला गजाआड करण्यास यश मिळविले आहे.
सोमवारी 4 रोजी पहाटे संशयित ललन सिंग व त्याच्या टोळीने सांत इनेझ येथील मधुबन सर्कलजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला व सुमारे 20 लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास केला होता. शितल सांखवाळकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पणजी पोलिसांनी वाऱयाच्या गतीने तपासकामाला सुरुवात केली होती.
पोलीस निरीक्षक सुदेश नाईक स्वतः तपासकामात उतरले होते. त्यांच्यासोबत उपनिरीक्षक मंजूनाथ नाईक, साहिल वारंग, तसेच पोलीस एलआयबी टीमचे नितीन गावकर, इरमय्या बलबद्रा, आदित्य म्हार्दोळकर, सयेश उस्कईकर यांचा तपासकामात मोठा वाटा आहे.
संशयिताचे सापडले मोबाईल लोकेशन
घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी चोरीची वेळ आणि चोरी करण्याची पध्दत यावर लक्ष केंद्रीत केले होते. राज्यात गेल्या काही महिन्यापासून झालेल्या चोरी प्रकरणांची माहिती मिळवली तसेच यापूर्वी चोरी प्रकरणात अटक केलेल्या चोरटय़ांचीही माहिती मिळविली. पोलिसांनी मिळविलेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर एक बिहारी टोळीच अशा प्रकारे म्हणजे पहाटे उजेड होत असतो त्यावेळी चोरी करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या टोळीतील या अगोदर अटक केलेल्या संशयितांची माहिती पोलिसांनी मिळविली होती. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासून पाहिले असता एक संशयिताचे लोकेशन मिळाले तेव्हा पोलिसांची खात्री पटली की संशयित रेल्वेतून दिल्लीला जात असल्याचे कळले.
दिल्ली पोलिसांनी आवळल्या मुसक्या
निरीक्षक सुदेश नाईक व त्यांच्या टीमने वास्को ते मडगावपर्यंत दिल्लीला जाणाऱया रेल्वेच्या जवळजवळ सर्व डब्यांची तपासणी केली, मात्र संशयित दिल्लीला जायला रवाना झाला असल्याची खात्री पटली हाती. या सगळ्या घडामोडी होत असताना गोव्यातून सुटलेली रेल्वे दिल्लीत अवघ्या काही तासाने पोचणार होती. पणजी पोलिसांनी त्वरित दिल्ली पोलिसांशी संपर्क करून संशयितांची सर्व माहिती दिल्ली पोलिसांना पुरविली होती. संशयित दिल्ली पोचला तेव्हाच दिल्ली रेल्वे स्टेशनवर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेतले. पणजी पोलीस टीम दिल्लीला रवाना झाली असून आज संशयिताला गोव्यात आणणार आहे.