साटेली / भेडशी प्रतिनिधी:
भेडशी येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा (अनिल) मोरजकर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी चा राज्यस्तरीय प्रगतशील शेतीरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
श्री. मोरजकर हे एक हाडाचे शेतकरी म्हणून तालुक्यासह जिल्ह्यात परिचित आहेत. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा सेंद्रिय शेती संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. सेंद्रिय शेती करण्याचा त्यांचा नेहमीच आग्रह असतो या सेंद्रीय शेतीद्वारे त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत आणि त्याचा मोठा फायदा होतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. यापूर्वी त्यांना जिल्हा परिषदेचा सिंधुशेती पुरस्कार ,राज्य शासन कृषी विभागाचा शेतीनिष्ठ पुरस्कार ,दोडामार्ग तालुकास्तरीय भात शेती स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच कोकण कृषी विद्यापीठ दापोली काजू बोर्ड कोचीन मार्फत काजू प्रक्रिया उद्योग आधारित बनविलेल्या प्रदार्थाना बक्षिसे त्यांना प्राप्त झाली आहेत.
या मिळालेल्या शेतीरत्न पुरस्काराचे वितरण पुढील आठवड्यात मुंबई येथे समारंभाध्यक्ष पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा , अध्यक्ष अँड. कृष्णाजी जगदाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.