मोरजी / प्रतिनिधी
गोवा वन खात्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात स्थानिकांच्या व इतर संबंधितांच्या सहभागाने वन्यजीव सप्ताह साजरा केला. यानिमित्ताने मोरजी समुद्र किनारा आणि मोरजी समुद्र टर्टल ट्रस्टच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली.
कचरा आणि प्लास्टिक टाकल्याने सागरी आणि किनारपट्टी जीवनास आणि विशेषतः सागरी कासवाना धोका निर्माण होतो त्यासंबंधी जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. संपूर्ण समुद्रकिना-याची साफसफाई करण्यात आली असून प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला आणि तो साळगांव कचरा प्रक्रिया प्रकल्पात देण्यात येणार आहे.
निसर्गप्रेमी, विद्यार्थी, गावकरी, मोरजी समुद्रकिनारा टर्टल ट्रस्ट व दृष्टी व वनखात्याचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
वनप्रमुख आयएफएस सौरभ कुमार तसेच अन्य अधिकारी जाबेस्टिन, एसीएफ नंदकुमार परब, अभयारण्य व्यवस्थापक दामोदर सालेलकर, एसीएफ जेसे कुलाको, मोरजी समुद्र टर्टल ट्रस्ट प्रमुख सरिता फर्नांडिस, सरपंच वैशाली शेटगांवकर, उपसरपंच अमित शेटगांवकर, तुषार शेटगांवकर आणि इतर पंचसदस्य यावेळी उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेत सुमारे 140 जण निसर्गप्रेमी यात सहभागी झाले. सरपंच वैशाली शेटगावकर यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. वन अधिकारी सौरभ कुमार यांचे यावेळी भाषण झाले व त्यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेचे महत्त्व व वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व सांगितले. नागरिकांनी आपल्या कच-याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याचे वन खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.