प्रतिनिधी / पणजी
मोरजी येथील बेकायदेशीर बांधकामाला पेडणे उपजिल्हाधिकाऱयांनी स्थगिती देऊनही सदर आदेशाला न जुमानता बांधकाम सुरूच ठेवल्याचा आरोप करून न्यूवाडा येथील सुनंदा दाभोलकर यांनी आता उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे.
सदर बेकायदा बांधकामामुळे आपल्या घरापर्यंत जाणार रस्ता पूर्णपणे अडविला गेला असून निमुळती पायवाट सोडण्यात आली आहे. रस्त्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय सदर बांधकाम केले जाऊ नये, अशी मागणी करून याचिकदार दाभोलकर यांनी स्थानिक पंचायत, गटविकास अधिकारी तथा उपजिल्हाधिकाऱयांसमोर तक्रार केली. उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी प्रतिवादी पक्षाला नोटीस पाठवून सदर बांधकाम तत्काळ थांबविण्याचा आदेश दिला.
स्थानिक मोरजी पंचायतीनेही दखल घेऊन बांधकामावर स्थगिती दिली असताना सदर बेकायदा बांधकाम चालूच असल्याचा आरोप करून आता गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेऊन दाद मागण्याचे ठरविले आहे.