पंचायतसदस्यांच्या खास बैठकीत निर्णय : सरपंच प्रकाश वेळीप यांनी दिलेली माहिती, प्रत्येक प्रभागातील एक दुकान खुले राहणार
प्रतिनिधी / मडगाव
केपे तालुक्यातील मोरपिर्ला पंचायत क्षेत्रात गाळी-कानिबाग येथे गुरुवारी दोन कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोरपिर्ला पंचायत क्षेत्रातील लोकांचा बचाव करण्याकरिता मोरपिर्लाचे सरपंच प्रकाश वेळीप यांनी पंचायतीच्या सदस्यांची खास बैठक बोलाविली होती. या बैठकीत मोरपिर्ला पंचायत क्षेत्रातील सर्व भाग आज शनिवारपासून 14 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच वेळीप यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
या बैठकीस उपसरपंच मनीषा वेळीप तसेच श्रुतिया वेळीप, तुळशीदास वेळीप, कमलाकर वेळीप, भिसो गावकर व दिनेश गावकर हे सर्व पंच उपस्थित होते. मोरपिर्ला पंचायत क्षेत्रातील जे लोक सरकारी व खासगी क्षेत्रांत काम करतात त्यांनी आपल्या कामासाठी अवश्य जावे. पण त्यांनी सुद्धा आपली काळजी घेण्याची गरज आहे. आज शनिवारपासून मोरपिर्ला पंचायत क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात एक दुकान खुले ठेवले जाईल. लोकांवर अत्यावश्यक वस्तूंसाठी बाळ्ळी वा कुंकळळी अशा ठिकाणी जाण्याची पाळी येऊ नये यासाठी असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वेळीप यांनी पुढे बोलताना दिली.
अटींचे पालन करावे
प्रत्येक प्रभागातील दुकाने सकाळी 7 ते 11 व दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली जाईल. प्रत्येकाला अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी मास्क घालून बाहेर यावे लागेल आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. या अटींच्या पालनाची जबाबदारी गावातील प्रत्येक नागरिकावर राहील. तसेच गावातील लोकांना एकत्रित फिरण्याची सवय असून आता थोडे दिवस त्यांनी आपल्या घरी राहून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे सरपंच वेळीप म्हणाले.
यासंदर्भात गाळी-कानिबाग येथील स्थानिक दिलखुश गावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने आम्ही गावातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःची चाचणी करुन घ्यावी यासाठी गुरुवारी जनजागृती केली. त्यानुसार शुक्रवारी बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही आमच्या परिवारासमवेत जाऊन चाचणी करुन घेतली. अजून काही नागरिकांची चाचणी होणे बाकी असून ते आपली चाचणी आज शनिवारी करून घेतील. दरम्यान, मोरपिर्ला क्षेत्रातील दुकानदारांनी सरपंच वेळीप यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याकरिता शुक्रवारी स्वेच्छेने सर्व दुकाने बंद ठेवली.