पाचगाव / प्रतिनिधी
मोरेवाडी येथे कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहावे असा आदेश करवीर तहसीलदारांनी पाचगाव चे तलाठी प्रल्हाद यादव यांना दिला आहे . यामुळे नेहमी बंद अवस्थेत असणारे मोरेवाडी येथील तलाठी कार्यालय गजबजणार आहे .
पाचगाव येथील तलाठी प्रल्हाद यादव यांच्याकडे पाचगाव आणि मोरेवाडी येथील कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी आहे . मात्र यादव हे मोरेवाडी येथील तलाठी कार्यालयात कधीही उपस्थित राहत नाहीत अशी तक्रार अण्णासो मोरे यांनी लोकशाही दिनात अर्जाद्वारे केली होती. याची दखल घेत करवीर तहसीलदार यांनी तलाठी प्रल्हाद यादव यांना कोणत्या गावात कोणत्या दिवशी शासकीय कामासाठी उपस्थित असणार याबाबतचे वेळापत्रक तयार करावे तसेच मोरेवाडी येथेही कार्यालयीन कामासाठी उपस्थित राहावे असा आदेश दिला आहे .
यामुळे आता मोरेवाडी येथील सज्जा कार्यालय गजबजणार आहे .यापूर्वी मोरेवाडी येथील ग्रामस्थांना कार्यालयीन कामासाठी पाचगाव येथील तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. करवीर तहसीलदारांच्या या आदेशामुळे व अण्णासो मोरे यांच्या प्रयत्नांमुळे मोरेवाडी ग्रामस्थांची होणारी फरफट थांबणार आहे .