रात्री केला गावात प्रवेश : भीतीने ग्रामस्थांनी रात्र काढली जागून
प्रतिनिधी / दोडामार्ग:
तब्बल एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मोर्ले गावात हत्तीचे आगमन झाले. रविवारी रात्री 10. 30 वा. झालेल्या आगमनाने ही रात्र ग्रामस्थांनी जागून काढली. सध्या भीतीच्या छायेखाली ग्रामस्थ आहेत. गेल्यावर्षी याच मोसमात दाखल झालेल्या हत्तीने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना एंट्री केल्याने धांदल उडाली होती.
या बाबतची माहिती अशी की, रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मिलींद सुतार यांना आपल्या घराच्या बाजूला जंगलात झाडे तुटल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी हत्ती असल्याचा अंदाज घेत ही बाब संतोष मोर्ये यांना सांगितली. त्यानंतर सरपंच महादेव गवस, उपसरपंच पंकज गवस, अजित गवस, तुषार देसाई, प्रथमेश गवस, नारायण गवस, सुनील गवस यांनी त्या परिसरात जात खात्री केली, तर एक टस्कर फणसाचे झाड मोडत होता. त्यानंतर सरपंच गवस यांनी या बाबतची कल्पना वन विभागास दिली. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी मोर्ले येथे रात्री दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जंगल भागात हत्तीला पिटाळले. गेल्यावर्षी या गावातील जंगलात हत्ती बराच काळ स्थिरावला होता. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.