कराड वनविभागाची कारवाई, दोन मोर, सात मृत लांडोर हस्तगत
प्रतिनिधी/ कराड
राष्ट्रीय पक्षी मोर आणि सात लांडोर पक्षांची शिकार करणारास वनविभागाच्या पथकाने सोमवारी पकडले. कराड तालुक्यातील आटके येथे फासकी लावून त्याने या पक्षांची शिकार केल्याचे उघड झाले असून संशयिताकडून दोन मोरांसह सात मृत लांडोर हस्तगत केले आहेत.
गोरख राजेंद्र शिंदे (वय 32, सध्या रा. कृष्णा कारखाना परिसर, ता. कराड, मूळ रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे शिकारी संशयिताचे नाव आहे. वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आटके (ता. कराड) येथे एकाने राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार केली असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार साहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्यासह वनपाल ए. पी. सवाखंडे, बी. सी. कदम, रामदास घावटे, वनरक्षक सुनिता जाधव, रमेश जाधवर, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, जयवंत काळे यांनी आटके परिसरात पाळत ठेवून संशयिताचा शोध सुरू केला. दरम्यान कृष्णा नदीपात्रालगत असलेल्या खटकुळी, सावराई मळी नावच्या शिवारात छापा टाकला. त्यावेळी आरोपी गोरख शिंदे हा दोन मोर आणि सात लांडोरची शिकार करुन त्यांना प्लास्टिकच्या पोत्यात भरुन तेथून निघण्याच्या तयारीत होता. वन विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून शिकार केलेले मोर, लांडोर, एक दुचाकी व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. फासकीच्या सहाय्याने त्याने ही शिकार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे. सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे तपास करीत आहेत.