मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ‘सेव्ह मोलेम’ ला टोला : मोले येथे चौथ्या पक्षी महोत्सवाचे उद्घाटन , जैवविविधता उद्यान, पुलाचेही उद्घाटन
प्रतिनिधी / धारबांदोडा
जगद्विख्यात मोलेतील नैसर्गिक सौदर्य व जैवविविधता राखून ठेवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. ‘मोले सेव्ह’ करण्यासाठी मोलेकर व गोवेकर सक्षम आहेत, पुर्वजांनी सांभाळून ठेवलेली जैवविविधता नव्या पिढीने सांभाळणे गरजेचे आहे. मोलेतील हिरवाईने नटलेले निसर्गसौदर्य व जैवविविधता देश विदेशातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी पक्षी महोत्सवासारखे उपक्रम होणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडले.
वन खात्यातर्फे मोले येथे काल शुक्रवारी आयोजित पेलेल्या चौथ्या पक्षी महोत्सव व बरकटे मोले येथे बांधलेल्या जैवविविधता उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फळसकटा-मोले येथे नव्याने बांधलेल्या पुलाचेही उद्घाटन मुख्यमंत्र्याहस्ते करण्यात आले.
वन खात्याचे काम वाखाणण्याजोगे
पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की येथील नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवले व त्याचे संवर्धन केले तर त्याचा लाभ हा गोवेकरांबरोबरच देशी विदेशी पर्यटकांनाही होऊ शकतो. निसर्गाचा समतोल राखताना वनखात्याने जे काम हातात घेतले आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.
तीन हजार लोकांना लवकरच सनदा
वनखाते व लोकांमध्ये असलेला वाद संपुष्टात आला पाहिजे, यासाठी वनहक्क कायद्याखाली जमिनीच्या सनदा लोकांना मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सुमारे दहा हजार लोकांनी वनहक्क कायद्याखाली जमिनीचा दावा केला असून त्यातील सुमारे तीन हजार लोकांना लवकरच सनदा दिल्या जातील असे त्यांनी नमूद केले.
बरकटे येथे पर्यटन व स्थानिकांना रोजगारही
ईको पेन्डली पर्यटनाअंतर्गत अनेक तरूणांना मार्गदर्शन करण्यात येत असून रानात असलेल्या औषधी फळांचा योग्य उपयोग व्हावा यासाठीही वनखाते प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. बरकटे येथील जैवविविधता उद्यानातून स्थानिकांना रोजगार मिळावा, असा मुख्य हेतू असून पर्यटकांनाही एक वेगळा अनुभव घेता येईल असे ते शेवटी म्हणाले.
त्याच्यासोबत बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, प्रधान वनपाल सुभाष चंद्र, अतिरिक्त प्रधान वनपाल संतोष कुमार, मुख्य वनपाल सौरव कारखानीस, मोलेचे सरपंच तन्वी केरकर, कुळेचे सरपंच मनिष लांबोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पक्षी महोत्सवातून पर्यटनाला उभारी – पाऊसकर
चौथा पक्षी महोत्सव मोले येथे आयोजित केल्याने बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले. जैवविविधता उद्यान व पक्षी महोत्सवासारख्या कार्यक्रमातून येथील पर्यटनाला चालना मिळणार असून त्य़ाचा लाभ स्थानिकांना होणार असल्याचे ते म्हणाले. पक्षी हा मानवाच्या जीवनाचा महत्वाचा घटक आहे. त्याच्यापासून मानवाला लाभ होत असून झाडांना संजीवनी देण्याचे काम ते करतात. परिसर स्वच्छ राखण्यातही पक्षी महत्चाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. जगात सुमारे पाच हजार प्रकारच्या पक्षांच्या जाती आहेत. भारतात सुमारे दीड हजार प्रजाती असून गोव्यात साडेचारशे पक्षांच्या प्रजाती आढळतात असल्याची माहिती त्यांनी दिली. मोले, काले व साकोर्डा येथे वनविभागात लोकवस्ती आहे, अशा लोकांचे पुनर्वसन वनखात्याने करावे. या लोकांना इतर ठिकाणी जमिनी देऊन हा प्रश्न कायमचा निकालात काढावा अशी मागणी मंत्री पाऊसकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीताने झाली. दीप प्रज्ज्वलनाने पक्षी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रधान वनपाल सुभाष चंद यांनी स्वागत केले. संतोष कुमार यांनी आभार मानले. वनखात्यातर्फे घेतलेल्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना यावेळी प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले.