कोरोनावरील उपचारात सहाय्यभूत ठरणार : मर्क फार्माकडून निर्मिती
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटन सरकारने कोरोनावरील उपचारात वापरल्या जाणारी मोल्नुपिराविर पिल (गोळी किंवा टॅबलेट)ला सशर्त मंजुरी दिली आहे. याचबरोबर कोरोना संसर्गाच्या उपचारात कुठल्याही औषधाला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. मर्क फार्मा या जर्मन कंपनीने या टॅबलेटची निर्मिती केली आहे.
स्वतःच्या कोविड-19 टॅबलेटची निर्मिती करण्याची मंजुरी अन्य कंपन्यांनाही देणार असल्याचे मर्क फार्माने म्हटले आहे. कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक लाभ गरीब देशांना होणार आहे. हे देश कोरोनावरील महागडी लस खरेदी करण्यास सक्षम नाहीत.
परीक्षणात यशस्वी
मर्क फार्माचे परीक्षण जर्मनीसह अनेक देशांमध्ये सुरू होते. कोरोनावरील उपचारात ही गोळी प्रभावी ठरत असल्याचे परीक्षणात सिद्ध झाले आहे. याचमुळे ब्रिटनच्या सरकारने या गोळीला औपचारिक पण सशर्त मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात किंवा रुग्णालयांमध्ये हे औषध किंवा टॅबलेट कधीपासून सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंबंधी लवकरच माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. या औषधाचे वैज्ञानिक नाव मोल्नुपिराविर आहे.
काय होणार लाभ ?
मोल्नुपिराविर अत्यंत जलदपणे कोरोनाच्या लक्षणांची तीव्रता कमी करणार आहे. याच्या वापरामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकेल. कोरोनावरील उपचारात या टॅबलेटला ऐतिहासिक यश म्हणून पाहिले जातेय. या गोळीच्या वापरामुळे मृत्यूंची संख्या कमी होणार आहे, तसेच बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल न करता घरातच बरे करता येईल. सद्यकाळात अमेरिका आणि युरोपमध्येही या औषधाचे परीक्षण सुरू आहे. ब्रिटननंतर उर्वरित देश देखील या गोळीला मंजुरी देऊ शकतात असे मानले जातेय.
आतापर्यंत उत्तम निष्कर्ष
या औषधाचे प्रारंभिक निष्कर्ष उत्तम राहिले आहेत असे उद्गार मेडिसीन पेटेंट पूलचे कार्यकारी संचालक चार्ल्स गोर यांनी काढले आहेत. लसीच्या निर्मितीची अन्य कंपन्यांना मंजुरी देण्याचा करार करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण कुठलाच देश किंवा कंपनीने याकरता तयारी दर्शविलेली नसल्याचे गोर म्हणाले. मर्क फार्माने युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आणि युरोपियन मेडिसीन एजन्सीला औषधला मंजुरी देण्याचे आवाहन केले आहे. पण दोन्ही यंत्रणांनी अद्याप याला कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही.
औषधामुळे होणार लाभ या औषधामुळे रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता कमी होईल आणि मृत्यूंनाही मोठय़ा प्रमाणात रोखता येणार आहे. कोरोनाची प्रारंभिक लक्षणे दिसून आल्यावर आतापर्यंत या गोळीला अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही गोळी घरातच घेता येणार आहे. याच्या वापरामुळे रुग्णांचा भार कमी होईल आणि सर्वात मोठा लाभ गरीब देशांना होणार असल्याचे मर्क फार्माने म्हटले आहे.