कुलगाममध्ये चकमक : सुरक्षा दलाला मोठे यश
श्रीनगर : कुलगाम जिल्हय़ातील चिमर गावात शुक्रवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा समावेश असल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. आयईडी तज्ञ असलेल्या जैशच्या स्वयंघोषित कमांडरचे नाव वालिद भाई असे आहे. अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलीसचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी वालिद हा मागील दीड वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय होता. सुरक्षा पथकाला चकवून पळून जाण्यात तो चार वेळा यशस्वी झाला होता. मात्र शुक्रवारी सुरक्षा पथकाने केलेल्या यशस्वी मोहिमेत वालिद ठार झाला, असे ते म्हणाले. वालिद थेट पाकिस्तानमधून येणाऱया आदेशांचे पालन करत होता. तसेच हल्ल्यांच्या कटाचे नियोजन करून सहकारी दहशतवाद्यांना सूचना देत होता, असेही त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांत सुरक्षा पथकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमागे वालिदचा सहभाग होता, अशी माहिती त्यांनी दिली.
चकमकीत तीन जवान जखमी
कुलगाम चकमकीत तीन जवान जखमी झाले. सर्व जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलीसचे महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे सुरक्षा पथकाने कुलगाम जिह्यातील चिमर गावात शोधमोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असताना पकडले जाण्याच्या भीतीने वालिद आणि त्याच्या सोबत असलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा पथकांनी लगेच गोळीबार येत असलेल्या दिशेने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्याने चकमक झडल्याचे सांगण्यात आले.
कुपवाडय़ात एक दहशतवादी ठार
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्हय़ात गुरुवारी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका दहशतवाद्याला सुरक्षा पथकाने ठार केले. केरन सेक्टरमध्ये सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. ठार केलेल्या दहशतवाद्याकडून सुरक्षा पथकाने एक रायफल जप्त केली.