सोबत असलेल्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल
वार्ताहर /दड्डी
दोन मित्रांसमवेत मोहनगा (दड्डी) भावकेश्वरी देवी यात्रेला गेलेल्या बाळेकुंद्री खुर्द येथील एका युवकाचा खून झाला आहे. बुधवार दि. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून दड्डी क्रॉसजवळ या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.
सदानंद इरय्या कुलकर्णी (वय 33) रा. बाळेकुंद्री खुर्द असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची आई महादेवी इरय्या कुलकर्णी यांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. खुनाचे निश्चित कारण समजू शकले नाही.बुधवारी दुपारी दड्डी क्रॉसजवळ सदानंदचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन ओळख पटविली.
सदानंदसाठी दोन-तीन दिवसांपासून दड्डी, मोहनगा परिसरात शोध सुरू होता. कारण मित्रांसमवेत यात्रेला म्हणून गेलेला सदानंद घरी परतला नव्हता. त्याच्या आईने सुरुवातीला आपला मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद यमकनमर्डी पोलिसात दिली होती.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, उपनिरीक्षक डी. व्ही. न्यामगौडा, एस. एम. चिक्काण्णा आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ज्या दोघा जणांसमवेत सदानंद यात्रेला गेला होता, त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून ते सापडल्यानंतरच सदानंदचा खून कशासाठी झाला, याचा उलगडा होणार आहे.
बाळेकुंद्री खुर्द येथील संतोष इराप्पा काकती, राजू गदगय्या हिरेमठ यांच्यासोबत सदानंद 18 फेब्रुवारी रोजी यात्रेला गेला होता. तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. या दोघा जणांवर भादंवि 302 कलमान्वये खून व 201 कलमान्वये पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.