कोलकाता / वृत्तसंस्था
भारतातील दिग्गज फुटबॉल क्लब मोहन बगान न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरमध्ये नॅस्डॅक बिलबोर्ड्सवर सूचिबद्ध झाले असून असा सन्मान लाभणारी ती भारतातील आजवरची पहिली क्रीडा संस्था ठरली आहे. 1911 मध्ये 29 जुलै याच दिवशी मोहन बगान संघाने आयएफए शील्ड स्पर्धा जिंकली होती. दरवर्षी हा दिवस बगान संघातर्फे साजरा केला जातो. योगायोगाने यंदा याच दिवशी नॅस्डॅकवर त्यांची वर्णी लागली आहे. 1911 मध्ये या दिवशी झालेल्या अंतिम लढतीत बगानने ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंटला 2-1 असे नमवत स्पर्धेवरील ब्रिटीश मक्तेदारी संपुष्टात आणली होती.
1889 मध्ये स्थापन झालेल्या मोहन बगान संघाचे अवघ्या जगभरात चाहते आहेत. अर्थात, अमेरिकन स्ट्रॉक एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध होताना त्यांचा लोगो झळकणे मात्र ऐतिहासिक ठरले आहे.
कोटस
मोहन बगानचे चाहते व समर्थक यांच्यासाठी हा विशेष अभिमानाचा क्षण आहे. मोहन बगानच्या जागतिक स्तरावरील उंचीचे हे आम्ही प्रतीक मानतो. भारतातील एकाही क्रीडा संस्थेला असा पराक्रम यापूर्वी गाजवता आलेला नाही’.
-मोहन बगानचे वरिष्ठ पदाधिकारी देबाशीष दत्ता