इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेची रुपरेषा जाहीर – 19 नोव्हेंबरला प्रारंभ, 27 नोव्हेंबरला रंगणार कोलकाता डर्बी
मुंबई / वृत्तसंस्था
एटीके मोहन बागान व केरळ ब्लास्टर्स एफसी यांच्यात यंदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सलामीचा सामना दि. 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. सोमवारी आयोजकांनी या स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली. त्यानुसार, दि. 27 नोव्हेंबर रोजी कोलकाता डर्बी रंगेल.
एटीके मोहन बागानचा संघ सलामी लढतीनंतर साधारणपणे आठवडाभराच्या अंतराने एससी ईस्ट बंगालविरुद्ध मैदानात उतरेल. ती बंगाल डर्बी असणार आहे. ईस्ट बंगालचा संघ हंगामातील पहिली लढत जमशेदपूर एफसी संघाविरुद्ध दि. 21 नोव्हेंबर रोजी खेळेल. त्यानंतर पुढील दिवशी टायटल-होल्डर्स मुंबई सिटी एफसी संघ ताज्या दमाने उतरणाऱया एफसी गोवा संघाची पारख करेल.
आयएसएलमधील पहिली डर्बी एससी ईस्ट बंगाल-एटीके मोहन बागान यांच्यात दि. 27 नोव्हेंबर रोजी होईल. 2021-22 हंगामात एकूण 115 सामने खेळवले जाणार असून यात 11 फेऱयातील 55 सामन्यांचा तपशील सध्या जाहीर केला गेला आहे. हे सामने दि. 9 जानेवारी 2022 पर्यंत होतील. सर्व सामने गोव्यात होतील आणि डबल हेडर्स शनिवारी होतील. यातील दुसरा सामना रात्री 9.30 वाजता खेळवला जाईल. आठवडय़ातील रोजचे अन्य सर्व सामने सायंकाळी 7.30 पासून खेळवले जाणार आहेत.