बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
साईराज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित 7 व्या साईराज चषक आंतर राज्य निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी उपांत्य सामन्यात अलोन मुंबई संघाने सरकार गांधीनगर संघाचा 23 धावांनी तर मोहन मोरे संघाने एचसीव्ही संघाचा 4 गडय़ांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अख्तर शेख (अलोन), सुहास मोहन मोरे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर पहिल्या सामन्य़ात अलोन मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 12 षटकांत 5 गडी बाद 144 धावा केल्या. शाहीद शेखने 2 षटकार 4 चौकारांसह 43, सुनील चावरेने 4 षटकार व 1 चौकार व अख्तर शेखने 5 षटकार व 1 चौकारांसह प्रत्येकी 40 धावा केल्या. सरकार गांधीनगरतर्फे बरकत व अमोल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सरकार गांधीनगरने 12 षटकांत 6 बाद 121 धावा केल्या. अर्जुन भोसलेने 8 षटकार व 1 चौकारांसह 24 चेंडूत 62 धावा केल्या. अलोनतर्फे मुस्तकीमने 27 धावांत 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात एचसीव्हीने 12 षटकांत 6 बाद 92 धावा केल्या. अवधूत पाटीलने 4 षटकार 1 चौकारांसह 39 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रथमेस बारीने 18 धावात 2 तर प्रज्योतने 14 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल मोहन मोरे संघाने 9.1 षटकात 6 बाद 95 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात सुहासने 4 षटकार 2 चौकारांसह 39, अनिकेतने 3 षटकार 1 चौकारांसह 24 धावा केल्या. एचसीव्हीतर्फे सचिन चौगुलेने 27 धावांत 3 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे किरण जाधव, संजय कडोलकर, विजय पाटील, मंगेश पवार यांच्या हस्ते अख्तर शेखला सामनावीर तर संतोष जैनोजी, अमीत पाटील, शरद पाटील, मोहन मोरे यांच्या हस्ते सुहास याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रविवारी अंतिम सामना
मोहन मोरे वि,. अलोन मुंबई यांच्यात सकाळी 10 वाजता.