सिराजच्या विलक्षण गुणाचे गांगुलीकडून कौतुक
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय संघात स्थान मिळविणारा नवोदित वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडिलाचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सिराजला पुन्हा ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने अधिकृत परवानगी दिली. पण, आपल्या वडिलाच्या अंत्ययात्रेसाठी मोहम्मद सिराज भारतात येणार नसून तो आपल्या संघाबरोबरच ऑस्ट्रेलियात राहणार आहे. मोहम्मद सिराजच्या या धाडसी निर्णयाचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने कौतुक केले आहे.
मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे ऑटो रिक्षा चालक होते. आपल्या मुलाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ होण्यापूर्वी त्याचे दुदैवी निधन झाले. मुलाच्या क्रिकेट कारकीर्द पाहण्याची संधी त्यांना मिळू शकली नाही. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियातच आपला संघाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याने बीसीसीआयतर्फे त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले असून सिराजच्या कुटूंबियाच्या दुःखात सहभागी असल्याचे संघटनेचे सचिव जय शहा यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आगामी मालिकेसाठी दाखल झाला असून उभय संघात चार सामन्यांची कसोटी मालिका तसेच टी-20 आणि वनडे मालिका खेळविल्या जाणार आहेत.
भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियात आगमन झाल्यानंतर कोरोना महामारी समस्येमुळे संघातील सर्व खेळाडूंना 14 दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. क्वारंटाईनचा निम्मा कालावधी आता संपला असून सध्या भारतीय संघातील खेळाडू सिडनीमध्ये कोरोना नियमाचे पालन करत सराव करीत आहेत.