वार्ताहर/ दाभोळ
दाभोळमध्ये सात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर संपूर्ण मोहल्ला सील करू नये यासाठी तेथील महिला आक्रमक झाल्या. कडक निर्बंध लागू असतानाही प्रशासनाकडून आलेले सील करण्यासाठीचे साहित्य उडवून लावत घोषणा देत महिलांनी मंगळवारी सकाळी मोर्चा काढला. मोहल्ला सील केलेला असतानाही पोलीस, पोलीस-मित्र यांच्यासमोर हा प्रकार घडलेला असतानाही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी दाभोळ मोहल्ल्यातील एक व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपर्कातील 11जणांना क्वारंटाईन करून त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र चाचणी अहवाल येण्याअगोदरच त्या 11 जणांना घरी पाठवण्यात आले. मात्र ज्यावेळी त्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळले त्यावेळी शासकीय यंत्रणांची धावपळ सुरु झाली. हा मोहल्ला ताबडतोब सील करण्यात आला. मात्र तरीही त्यादिवशी त्या 7 जणांना योग्य ठिकाणी नेण्याची कार्यवाही झाली नाही. रूग्णवाहिका नसल्याने दुसऱयादिवशी दुपारपर्यंत सातहीजण मोहल्ल्यातच होते.
पंधरा दिवसांपूर्वी खडपकरवाडी येथे 2 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यामुळे ती संपूर्ण वाडी 14 दिवस सील करण्यात आली होती. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य केलेले आहे. मात्र काही ठिकाणी सर्वेक्षणासाठी येणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना काही ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत नाही. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या सात व्यक्तींमुळे पूर्ण मोहल्ला सील होऊ नये यासाठी मोहल्ल्यातील 30 ते 35 महिलांनी सील केलेले साहित्य उडवून टाकले व घोषणा देत मोहल्ल्यातून मोर्चा काढला. कडक निर्बंध लागू असतांना, मोहल्ला सील केलेला असतानाही पोलीस, पोलीस-मित्र यांच्या समक्ष हा प्रकार घडला. या घटनेनंतर दाभोळ परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.