ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोना विरुध्दची लढाई लढण्यासाठी पंजाब सरकारने चार नवीन टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा आणि त्यामध्ये 131 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या बरोबरच मंत्रिमंडळाने या लॅबमध्ये चार नवीन सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी चिकित्सा शिक्षा आणि संशोधन विभागाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळाचे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोहालीमध्ये पंजाब फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि पंजाब बायोटेक्नॉलॉजी इन्क्युबेटर लॅब बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय जालंधरमध्ये नॉर्दन रिजनल डिसीज डायग्नोस्टिक लॅबोरेटरी आणि लुधियानामध्ये श्री गुरु अंगद देव व्हेटर्नरी आणि ॲनिमल सायन्स लॅबची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी 13 हजार टेस्ट करता येणार आहेत. सध्या पटियाला, अमृतसर आणि फरीदकोटमधील मेडिकल कॉलेजमध्ये दररोज 9000 टेस्ट करण्याची क्षमता आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले की, ज्या सर्व नियुक्त्या केल्या जाणार आहेत त्या बाबा फरिद यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स फरीदकोट कडून आउटसोर्सद्वारे केल्या जाणार आहेत. स्टॉफमध्ये केल्या जाणाऱ्या 131 सदस्यांच्या नेमणुकांमुळे प्रत्येक महिन्याला 17.46 लाख तर एडहॉक सहाय्यक प्रोफेसरांच्या पदासाठी प्रत्येक महिन्याला 3.06 लाख रुपये खर्च येणार आहे. ही रक्कम प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन फंडातून दिली जाणार आहे. या 131 स्टाफ सदस्यांमध्ये रिसर्च सायंटिस्ट, लॅब टेक्निशियन, डाटा एंट्री ऑपरेटर, लॅब अटेंडंट आणि साफसफाई कर्मचारी आदी पदांचा समावेश आहे.