पुलाची शिरोली /वार्ताहर :
मौजे वडगांव ते हेरले ता. हातकणंगले रस्त्यावरील कासार मळा येथील विहीरीचा भाग खचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. बांधकाम खात्याने येथे तत्काळ संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांच्यातून होत आहे.
येथील संरक्षक भिंत पडून रस्त्याचाही काही भाग खचला आहे. त्यामुळे हा रस्ता अवजड वाहनांसह सर्वच वाहनांना वाहतूकीस धोकादायक बनला आहे. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ विहिरीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करून खचलेल्या रस्त्याचा भराव टाकावा. व या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववतपणे सुरळीत करावी. अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
मागील आठवडयात शुक्रवारी अतिवृष्टीने मौजे वडगाव – हेरले रस्त्यावरील कासार मळा येथील विहिरीची संरक्षक भिंत पडून रस्ता खचला आहे. तेंव्हा पासून हा रस्ता अवजड वाहने, चारचाकी, तीनचाकी वाहनांसाठी बंदी केली आहे. हा रस्ता नागाव, मौजे वडगाव, एमआयडीसी शिरोली ,पेठवडगांव आदी गावाकडे जाण्याचा सोयीचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहतुक सुरू असते. सद्या अवजड वाहनांना हा रस्ता बंद असल्याने मोठी गौरसोय होत आहे.
या रस्त्यावरील उजव्या बाजूच्या दोन विहिरी व डाव्या बाजूच्या दोन विहिरीवर संरक्षक भिंती नसल्याने हा रस्ता वाहतूकिस धोकादायक बनला आहे. तरी या रस्त्यावरील चारही विहिरीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करून हा रस्ता वाहतूकीस सुरक्षित पूर्ववत करावा. अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.