यांगोन / वृत्तसंस्था
म्यानमारमध्ये लोकशाही आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुरुवारी आणखी 6 आंदोलक ठार झाले. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर बेछूट गोळीबार केल्याचा दावा एका आंदोलकाने केला आहे. आंदोलक शांततेने निषेध व्यक्त करत असताना सुरक्षा रक्षकांकडून गोळीबार केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पोलीस स्थानकासमोरच निदर्शने करणाऱया आंदोलकांना लक्ष्य करण्यात आले. पोलिसांनी आगोदर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. त्यानंतर जमावावर रबरी गोळय़ा मारल्या. त्यानंतर खऱया गोळय़ा झाडल्या. या संघर्षात किमान 6 जण ठार झाले असल्याचे अन्य आंदोलकांनी सांगितले. लष्करी राजवटीने आंदोलकांविरोधात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजारांपेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्स या गटाने दिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारमधील लष्करी राजवटीवर तीव्र टीका करून आंदोलनविरोधी कारवाई तातडीने थांबवण्याची सूचना केली आहे.