सैन्य राजवटीकडून कारवाई सुरूच- 8 जण ठार
वृत्तसंस्था/ यंगून
म्यानमारमध्ये सत्तापालट आणि रात्रसंचारबंदीला विरोध करणाऱया निदर्शकांवर शनिवारी सुरक्षा दलांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात 8 हून अधिक जण मारले गेले आहेत. गोळीबाराची घटना शनिवारी सकाळी म्यानमारचे सर्वात मोठे शहर यंगूनमधील आहे. शहराच्या बाहेरील भागात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 अन्य निदर्शकांचा मृत्यू मांडले शहरात झाला आहे. या सर्वांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे. थाकेटा वसाहतीत सुरक्षा दलांनी निदर्शने करत असलेल्या लोकांना पांगविण्यासाठी गोळीबार केला होता. यादरम्यान दोन जणांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.
मध्य म्यानमारच्या मांडले शहरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी कथितरित्या दारूगोळय़ाचा वापर निदर्शकांवर केला आहे. द इरावदी या वृत्त संकेस्थळावर सामाजिक शांतता भंग करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सैन्यराजवट लागू झाल्यावर पहिल्यांदाच एका प्रसारमाध्यम संस्थेला आरोपांना तोंड द्यावे लागत आहे.
सू की नजरकैदेत
आंग सू की यांना मागील 5 आठवडय़ांपासून अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे. बेकायदेशीर स्वरुपात रेडिओ उपकरण बाळगणे आणि कोविड-19 नियमांचे उल्लंघन करण्यासह अनेक आरोपांना त्या तोंड देत आहेत.
70 हून अधिक जणांचा मृत्यू
1 फेब्रुवारी रोजी सैन्य राजवट लागू झाल्यावर आणि सत्तापालटापासून म्यानमारच्या रस्त्यांवर सातत्याने निदर्शने सुरू आहेत. तर सैन्याने या निदर्शकांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शेकडोंच्या संख्येत लोक सैन्य राजवटीच्या विरोधात देशभरातील रस्त्यांवर उतरले आहेत. निदर्शनांमध्ये आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा काही संघटनांकडून केला जात आहे. तर 2 हजारांहून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.