ऑनलाईन टीम / नाएप्यीडॉ :
म्यानमारमध्ये काचिन राज्यात दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या हिरव्या दगडी खाणीत भूस्खलन होऊन 162 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्यानमारच्या माहिती व प्रसार मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
काचीन राज्यातील हापकांत येथे मागील एक आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हपकांत येथील हिरव्या दगडी खाणीत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. माहिती व प्रसार मंत्रालयाने मृतांचा आकडा 162 प्रसिद्ध केला आहे. तर अग्निशमन दलाने मृतांचा आकडा 126 नोंदवला आहे.
भूस्खलनात ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाढले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, अग्निशमन दल, बचाव पथके आणि इतर आपत्कालीन सेवा या ठिकाणी कार्यरत आहेत. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. म्यानमारमधील खाणकामस्थळी अशा घटना अनेकदा घडतात. 2015 मध्ये अशाच एका घटनेत 113 लोक ठार झाले होते.