ऑनलाईन टीम / यंगून :
म्यानमारमध्ये लष्करशाही विरोधात निदर्शने करणाऱ्या जमावावर रविवारी सुरक्षा रक्षकांनी पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात यंगूनजवळील हेलिंग्थया औद्योगिक क्षेत्रात 22 तर देशभरात 38 नागरिक मारले गेले. या हिंसाचारात एक पोलीस अधिकारीही ठार झाला आहे, तर तीन पोलीस जखमी झाले.
म्यानमारच्या अधिकृत वृत्तवाहिनीनुसार, हेलिंग्थ्यातील लष्करी हुकूमशाहीच्या वतीने मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. यापूर्वी शनिवारीही सुरक्षा दलांनी 13 निदर्शकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारले. लष्कराने देशात सत्ता काबीज केल्यानंतर सहा आठवड्यांच्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर 2100 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आज (सोमवारी) म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सांग स्यु की यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.