मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश- अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देशांकडून निषेध
यांगोन / वृत्तसंस्था
म्यानमारमध्ये लष्कर आणि आंदोलनकर्त्यांमधील संघर्षाने परमोच्च बिंदू गाठला आहे. शनिवारी पुन्हा एकदा आंदोलन भडकल्याचे दिसून आले असून दिवसभरात लष्कराच्या गोळीबारात 114 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचा दावा करत ‘असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्स’ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. म्यानमारमधील ‘माऊ’ या आघाडीच्या न्यूज वेबसाईटनेही याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियन आदी देशांनी म्यानमारमध्ये शनिवारी झालेल्या हिंसाचाराचा कडक शब्दात निषेध नोंदवला आहे.
म्यानमारमध्ये लष्कराने राष्ट्राध्यक्ष आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवल्यानंतर तिथे लष्करी राजवट लागू केली आहे. या राजवटीविरोधात स्थानिक जनता विरोध करत असून या आंदोलनाला थोपविण्यासाठी लष्कराने हिंसाचाराचा मार्ग निवडला आहे. आतापर्यंत या हिंसाचारात शेकडो लोकांचा जीव गेला आहे. शनिवारी आंदोलनकर्ते आणि लष्करात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा लष्कराने आधीच दिला होता.
म्यानमारमध्ये शनिवारी ‘लष्कर दिवस’ साजरा करण्यात येत होता. यावेळी बर्मा येथे आयोजित एका कार्यक्रमस्थळी आंदोलनकर्त्यांनी मोठा मोर्चा काढत लष्करी राजवटीला विरोध दर्शवला. त्यावेळी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात 114 जणांचा मृत्यू झाला. याआधी 14 मार्चला एकाच दिवशी 74 जणांचा मृत्यू झाला होता.
लष्करशाहीबाबत तीव्र नाराजी
म्यानमारमध्ये लष्कराने केलेला हिंसाचार पाहून आम्ही स्तब्ध झालो आहोत. लष्कर काही ठराविक लोकांची सेवा करण्यासाठी सामान्य नागरिकांचा बळी देत आहे, असे ट्विट अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी केले आहे. लष्कराकडून निःशस्त्र सामान्य नागरिकांची हत्या केली जात आहे, असे अमेरिकन दुतावासानेही म्हटले आहे. ब्रिटनचे राजदूत डेन चग यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत लष्कराने निःशस्त्र नागरिकांवर गोळीबार करून आपली प्रति÷ा गमावली आहे, असे स्पष्ट केले.