प्रसिद्ध अभिनेत्याला अटक – फेसबुकने हटविले सैन्याचे मुख्य पेज
वृत्तसंस्था/ यंगून
म्यानमारमध्ये सैन्याकडून झालेल्या सत्तापालटाच्या विरोधातील निदर्शने आता अधिकच तीव्र झाली आहेत. बलप्रयोगानंतरही निदर्शने थांबत नसल्याचे चित्र आहे. याचदरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्याला निदर्शनांना समर्थन दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. देशातील दुसरे सर्वात मोठे शहर मंडालेमध्ये शनिवारी निदर्शकांवर गोळीबार झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले होते.
तर फेसबुकने रविवारी सैन्याचे मुख्य पेजच हटविले आहे. हिंसाचार भडकविण्यापासून रोखण्याच्या अंतर्गत फेसबुकने ही कारवाई केली आहे. 6 जणांना सैन्याने वाँटेड घोषित केले होते आणि यात अभिनेता लू मिन याचाही समावेश होता.
राज्यघटनेच्या अंतर्गतच सैन्य कारवाई करत असून याला बहुतांश लोकांचे समर्थन आहे. हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी निदर्शक दोषी असल्याचे विधान सैन्याचे प्रवक्ते झा मिन मिन तुन यांनी म्हटले होते. तर सत्तापालटानंतर आतापर्यंत 569 जणांना अटक करण्यात आली आहे.
1 फेब्रुवारी रोजी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीच्या सरकारला हटवून म्यानमारच्या सैन्याने सत्ता हाती घेतली होती. आंग सान सू की यांच्यासह ा अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तेव्हापासूनच देशात निदर्शने सुरू आहेत. ही निदर्शने रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही रोखण्यात आली आहे.