प्रतिबंध लादण्याचा अमेरिकेचा इशारा
संयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था
म्यानमार या देशात मंगळवारी लागू करण्यात आलेल्या लष्करी राजवटीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चर्चा होणार आहे. तर लष्करी राजवट उठवून तेथे लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी, अशी मागणी अमेरिकेने केली असून त्या देशावर कठोर प्रतिबंध लादण्याचा इशारा दिला आहे.
सोमवारी मध्यरात्री म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून तेथील लोकनियुक्त सरकार उलथवले. तसेच एक वर्षासाठी सत्ता हाती घेत आहोत असे घोषित करत आणिबाणी लागू केली. तसेच तेथील लोकनेत्या स्यु काई यांना अटक केली. जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी प्रतिबंधांचा इशारा दिला होता.
सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सध्या ब्रिटनकडे आहे. म्यानमारमधील घटना गंभीर असून त्यावर लवकरच सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बंद दरवाजाआड चर्चा केली जाईल, असे ब्रिटनने घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी म्यानमारमध्ये विशेष दूत पाठविला आहे. या दूताचा अहवालही या बैठकीत अभ्यासला जाईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.
शेजाऱयांशी चर्चा सुरू
म्यानमारच्या शेजारी राष्ट्रांशी अमेरिका व संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी चर्चा करीत आहेत. या देशातील लष्करशाहीला विरोध करण्यासाठी अमेरिका आपल्या सर्व मित्रदेशांचे सहकार्य घेत आहे. भारतही म्यानमारचा शेजारी देश आहे. त्यामुळे भारताशीही चर्चा होत असणे शक्य आहे. मात्र, त्यासंबंधी अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, चर्चा सुरू असणे शक्य आहे.