नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीमध्ये म्युकरमायकोसिस या नव्या आजाराने डोके वर काढले आहे. म्युकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीसारख्या नव्या आजाराने मेडिकल जगतासमोर एक नवं आव्हान उभं केलं आहे. देशातल्या वाढत्या केसेस पाहता आरोग्य मंत्रालयानं या आजारासाठीही साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू केला आहे.
तेलंगाणा आणि राजस्थानने याआधीच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराला महामारी घोषित केलं आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेतली असून या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार देशभरातील सर्व सरकारी-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना म्युकरमायकोसिसबाबत साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये नमूद असलेल्या नियमावलींचं पालन करणं आवश्यक ठरणार आहे.
म्युकरमायकोसिससाठी साथ नियंत्रण कायदा लागू
साथीचे रोग नियंत्रण कायदा ( 1897) अंतर्गत आता म्युकरमायकोसिस हा लक्षणीय आजार म्हणून समावेश होणार आहे.
सर्व राज्य सरकारं, खासगी हॉस्पिटल्स यांना आजाराच्या चाचणीबाबत, उपचाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरनं दिलेल्या गाईडलाईन्स बंधनकारक राहणार आहे.
सर्व संशयित, आजारी रुग्णांच्या केसेस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळवणं बंधनकारक असणार आहे.
ब्रिटीशांनी प्लेगच्या साथीत आणलेला हा कायदा कोरोनापाठोपाठ आता म्युकरमायकोसिससाठीही लागू होत आहे.