ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये जातीच्या विषयावरून सध्या जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी प्रबोधनकार ठाकरे वाचण्याच्या सूचनेला राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली होतीच. त्यानंतर शनिवारी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अतिशय सूचक आणि मार्मिक अशा शब्दातली प्रबोधनकारांची आठवण करून दिली आहे.
जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दकि विकास नाही…जिथे बौध्दकि विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय! : प्रबोधनकार ठाकरे : ‘माझी जीवनगाथा’ (पाने 280-281), अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या उदयानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढीस लागला, राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची स्पर्धाच जणू सुरू झाली. यामध्ये काहीजणांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले, तर काहींनी राज यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
तर राज ठाकरेंच्या या विधानावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी प्रबोधनकार वाचावेत असा सल्ला दिला होता. शरद पवारांच्या या सल्ल्याला उत्तर देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. आजोबांनी लिहिलेली सर्व पुस्तके मी वाचली आहेत, प्रबोधकारांचे संदर्भ हे त्या काळातील होते असाही खुलासा त्यांनी केला. सोयीचे प्रबोधनकार सांगू नका, त्यांची भूमिका त्या त्या काळाशी संबंधित होती, सांगायचे असतील तर पूर्ण प्रबोधनकार सांगा, नाहीतर नादी लागू नका, प्रबोधनकार तुम्हाला झेपणार नाहीत, असे सडेतोड उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.